खरे काय?
शिवसेनेने 1984 च्या दंगलीत मुस्लिमांना धडा शिकवल्याने भिवंडीत 1992 साली दंगल झाली नाही'असे एका फेसबुक मित्राने माझ्या पोस्टवर लिहिले होते.
खरे काय? त्या काळात शिवसेना दंगल घडवीत असे की तिचा वापर करून घेतला जात असे?
1984 ची भिवंडी दंगल पेटवण्यामध्ये कट्टर धार्मिक मौलाना इम्तियाज (पूर्ण नाव आठवत नाही) व त्याचे साथीदार एका गटाकडून होते तर डॉक्टर व्यास (पूर्ण नाव आठवत नाही) नावाचा अर्धी चड्डी घालणारा व त्याचे मोजके सहकारी दुसऱ्या गटाच्या बाजूने होते. 1970 साली भिवंडीतील दंगलीला 'मादन कमिशनने' याच डॉक्टर व्यास व त्यांच्या सहकाऱ्यांना तसेच शिवसेना आरएसएस,...., यांना जबाबदार धरले होते.
भिवंडीला पोलीस उपायुक्त असताना 1989 साली एका शांतता बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत डॉ व्यास व मौलाना यांनी एकमेकावर आरोप करून तणाव वाढवायला सुरुवात केली. मी जाहीर पणे त्याच बैठकीत सांगितले की
"असे आरोप करणाऱ्यांच्या व चिथावणी देणाऱ्यांच्या घरात घुसून आम्ही गोळ्या घालू." त्या काळातील भिवंडीतील लोकांना तुम्ही विचारू शकता. अर्धे चड्डीवाले चिडले. अशी भाषा काहीना आवडली नाही. आमचे पोलिस खाजगीत म्हटले.'या खोपडे सायबांचा काय भरोसा नाय. हाजी मलंग गडाच्या पायथ्याच्या जंगलात घुसून त्यांनी राम शाम नावांच्या दरोडे खोराना गोळ्या घातल्या होत्या.' मग दोन्हीही गट टरकले. शासनाने नेमलेली अशी कमिटी शांतता कमिटी नसून अशांतता कमिटी असते असे म्हणून मी ती कमिटी बरखास्त केली. त्याऐवजी भिवंडी मध्ये सामान्य शांतता प्रिय सर्व थरातील लोकांच्या सत्तर कमिट्या बनवल्या व पुढे मोहल्ला कमिटी प्रयोग सुरू केला.
कॉमेंट करणाऱ्या फेसबुक मित्राला हे माहीत नसावे की 1984 साली भिवंडी बरोबर मुंबईतही दंगल झाली होती. तिथे शिवसेना होती. त्याच मुंबईत 1992 अयोध्ये घटनेनंतर दंगल झाली. तेव्हा तर दणकट शिवसेना होती. सर सेनापती बाळासाहेब ठाकरे होते. त्यांच्या डोळ्या देखत मुंबई दोनदा जळाली. हजार पेक्षा जास्त लोक मारले गेले. आर्मी आणली होती.तरीही दंगल आटोक्यात आली नव्हती. तीन महिन्यानंतर दंगल थांबली. पोलीस किंवा आर्मी मुळे नव्हे. तर दंगल करणारे दमले होते!
पण मुंबईपासून 35 किलोमीटर अंतरावरील भिवंडी हे अति संवेदनाक्षम शहर शांत राहिले. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकररावजी चव्हाण यांनी पुढाकार घेऊन या प्रयोगावर दिल्ली येथे राष्ट्रीय परिसंवाद ठेवला. क्षत्रिय हे त्यांचे सेक्रेटरी होते. तिथे मी हा प्रयोग सादर केल्यावर सर्वांनी मान्यता दिली. हा प्रयोग भारतभर राबविला पाहिजे यासाठी 'गाईडलाईन्स टू प्रमोट कम्युनल हार्मनी'या योजनेद्वारे देशातील सर्व राज्यांना मोहल्ला कमिटी ही योजना राबवावी असे आदेश 1995 साली दिले होते.
येले युनिव्हर्सिटी मधील प्राध्यापक डॉ आशुतोष वर्षने यांनी भारतातील वांशिक दंगलींचा अभ्यास करून त्यावर 'एथनिक व्हायोलन्स इन इंडिया हिंदू मुस्लिम....' हे बेस्ट सेलर पुस्तक प्रकाशित केले. भारतातील वांशिक दंगली व हिंदू मुस्लिम दंगली थांबविण्यासाठी आतापर्यंत फक्त एकच उपाय सापडलेला आहे आणि तो म्हणजे सुरेश खोपडे या पोलीस अधिकाऱ्याने राबविलेला भिवंडी प्रयोग! हे त्यांनी आपल्या ग्रंथात सविस्तर नमूद केले.
ग्रंथात काही मुद्दे उपस्थित केले की, एवढा पथदर्शी प्रयोग कसा राबविला? त्यांनी जातीय विचाराचे हिंदू मुसलमान लोक कसे बदलविले. जातीय प्रभावाखाली काम करणारे कनिष्ठ पोलीस कर्मचारी यांना कसे बदलविले. येणारा कोणताही बदल हाणून पाडणाऱ्या आपल्या 'जैसे थे वादी' वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसे बदलवले. राजकारणी लोकांना कसे बरोबर घेतले, अशा अनेक घटकांचा खोलात जाऊन शोध घेतला पाहिजे. शोध घ्यायचे दूरच राहिले पण तो प्रयोगच लाल कपड्यात बांधून ठेवण्यात आला! सेक्युलरिझमचा नारा देणारे पक्ष व त्यांचे नेते हे स्वतःचा स्वार्थ, कुटुंब,
गणगोत,... यात मश्गुल राहिले. डॉक्टर व्यास व त्यांच्या अर्धी चड्डी समर्थकांनी मुसंडी मारली.
1984 ची भिवंडी दंगल शिवसेनेने सुरू केली नाही किंवा दुसऱ्या गटाला धडा शिकवून थांबविली नाही. शिवसेनेचा, डॉक्टर व्यास आणि त्यांच्या अर्धी चड्डी मधील अनुयायांनी वापर केला. हेतू साध्य झाल्यावर याच शिवसेनेची नागपूर मधील अर्धी चड्डी वाल्याने मोड तोड केली. काँग्रेस मधील शंकरराव चव्हाण यांचा सुपुत्र, राष्ट्रवादीचे आदरणीय शरद पवार यांचा पुतण्या हे सगळे अर्धी चड्डी वाल्यांच्या दिंडीत सामील झाले हा सगळा इतिहास आपल्या डोळ्यापुढे आहेच!
बाबरी मशीद पतनानंतर 1992 साली भिवंडी शांत राहिली ती स्वतःला सेक्युलर बनवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप समाजवादी पार्टी,...., या पक्षातील नेत्यामुळे नव्हे तर आम्ही तिथे राबवलेल्या भिवंडी प्रयोग/ मोहल्ला कमिटी प्रयोग/खोपडे पॅटर्न यामुळे. हा प्रयोग इथल्या अर्धी चड्डी वाल्या आर्य ब्राह्मणांच्या हिताविरुद्ध येतो म्हणून ते दुसरीकडे बोट दाखवीत आहेत.
फेस बुक मित्रवर्य बर्वेजी तुम्ही प्रश्न विचारला म्हणून हे सगळे आठवले. विश्वास नसल्यास कृपया खात्री करा.
सुरेश खोपडे.