जातंकवाद !
आरक्षित घटकातील शिकणारी मुलं भविष्याला घेऊन काळजीत असतात. निश्चितीचा अभाव त्यांना छळतो. अलीकडे त्यांच्याच्यात 'जातंकवाद' हा शब्द खूप बोलल्या जातो. हिंदी पट्ट्यातून तो आलाय. तसे करणाराला ते 'जातंकवादी' म्हणतात.
ही मुलं त्याची बळी असतात. जर 'आतंकवाद' रुढ आहे तर जातंकवादही आहे. यात केवळ जात आणि जात आहे. तिही मानसिक मान्यतेने मानलेली खालची ! उत्तरपत्रिकेत नावगाव नसतेय. मुलाखतीत आडनावासह नाव असतेय ! ही भेदता संपायचे नाव घेत नाही.
नुकतेच संघ लोकसेवा आयोगाचे निकाल लागले. इथे या भेदतेने पुन्हा उचल खाल्ली. एससी चा टक्का पार घसरला. केवळ चवदा (१४) मुलं पास झाल्याचे सांगण्यात येते. जर हे खरे असेल तर भयंकर म्हणावे. बहुतेक घसरण वैयक्तिक मुलाखत (personality test) इथेच होण्याचे काय कारण असेल ?
सत्तेचे बदलते धोरण वातावरण निर्मितीत अदृष्य भूमिकेत असतेय. किती जातीचे आमदार खासदार यातुलनेत किती हिताची धोरणे अशी तुलना व्हावी. ती होत नाही. 'सायलेंट किलींग' सारखा प्रकार सुरु आहे. तरुण मित्र आतून अस्वस्थ आहेत.
'लॅटरल एन्ट्री' कुणासाठी हे लपून नाही. EWS कोटाचे लाभार्थी कोण हेही स्पष्ट झालंय. उद्योग करणे सरकारचे काम नव्हे असे सर्रास बोलले जाते. यावरून सरकारप्रमुखांची भूमिका खुली होते.
लोकांना हे सारं कळविण्याकडे बौध्दिक जागरणाचा कल असावा. तिथेच निदान खुणावते.
० रणजित मेश्राम